फलटण: साताऱ्यातील फलटण (Satara Honey Trap) तालुक्यात एक (Faltan News) धक्कादायक घटना घडली आहे. बनावट इंस्टाग्राम अकाउंटवरून महिला असल्याचे भासवून एका तरुणाला जाळ्यात ओढण्यात आले आणि त्यानंतर तीन जणांनी मारहाण करून लूट केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये एक युट्युबर, सातारा जिल्ह्यातून तडीपार केलेला सराईत गुन्हेगार आणि मनसे तालुकाध्यक्ष असल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील एका 35 वर्षीय तरुणाशी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील एका बनावट अकाउंटवरून महिला असल्याचे भासवून चॅटिंग सुरू करण्यात आली. आरोपींनी प्रेमळ बोलणे करून त्या तरुणाचा विश्वास संपादन केला. काही दिवसांनंतर त्यांनी त्याला भेटण्यासाठी वीर धरण परिसरात बोलावले. पीडित तरुण त्या ठिकाणी पोहोचताच तिघांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल फोन लुटून घेतला.
या घटनेनंतर पीडिताने शिरवळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि काही तासांतच आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. अटक केलेल्यांमध्ये युट्युबर किरण मोरे, साताऱ्यातून तडीपार असलेला संशयित विशाल जाधव आणि मनसे तालुकाध्यक्ष इरफान शेख यांचा समावेश आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की आरोपींनी याआधीही अशा प्रकारे इतरांना फसवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अजून कोणाला अशा प्रकारे फसवले असल्यास त्यांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या घटनेमुळे सोशल मीडियावरील बनावट अकाउंट्स आणि अज्ञात व्यक्तींशी चॅटिंग करताना सावधानता बाळगण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. इंस्टाग्राम आणि इतर सोशल प्लॅटफॉर्मवर ओळखीशिवाय संपर्कात येणाऱ्या व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नये, अशीही सूचना पोलिसांकडून देण्यात आली आहे.







