सांगली, ता. 14 : विहिरीतून शेतात सोडलेल्या पाण्याने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. पाण्याच्या पाटातून चक्क आगीच्या ज्वाळा भडकत असल्याचा धक्कादायक प्रकार जत तालुक्यातील उमदी येथे नगर-विजयपूर महामार्गालगत असलेल्या पवार वस्ती परिसरात घडला. विहिरीच्या पाण्यात ज्वलनशील पदार्थ मिसळल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत असून, महसूल प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे.

पवार वस्ती परिसरातील विहिरीच्या पाण्याला पेट्रोलसदृश वास येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे काही नागरिकांनी पाण्याची चाचपणी केली असता त्याने पेट घेतला. त्यानंतर शेतातील पाण्याच्या पाटातून आगीच्या ज्वाळा भडकताना दिसून आल्या. हा प्रकार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.

काही तरुणांनी विहिरीतील पाणी बाटलीत भरून पाहिले असता त्याचा रंग पिवळसर असल्याचे दिसून आले. पाण्याला पेट्रोलसारखा वास येत असल्याने या पाण्यात नेमका कोणता ज्वलनशील पदार्थ मिसळला आहे, याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे. घटनेची माहिती मिळताच उमदी महसूल मंडळ अधिकारी सैफन जातगार आणि तलाठी राजू इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत जतचे प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांनाही माहिती देण्यात आली आहे.

विहिरीजवळ दोन पेट्रोल पंप
विशेष म्हणजे, ज्या विहिरीच्या पाण्याला आग लागली, त्या ठिकाणापासून काही अंतरावर दोन पेट्रोल पंप आहेत. यातील एक एचपी कंपनीचा पेट्रोल पंप सुरू असून, दुसरा पेट्रोल पंप सध्या बंद आहे. त्यामुळे पेट्रोल पंपाच्या भूमिगत इंधन टाकीतून गळती होत आहे का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. भूमिगत टाकीतून पेट्रोल अथवा अन्य ज्वलनशील इंधनाची गळती होऊन ते भूगर्भातून झिरपत विहिरीच्या पाण्यापर्यंत पोहोचले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, विहिरीच्या पाण्यात नेमका कोणता ज्वलनशील पदार्थ आढळला आणि तो कुठून आला, हे प्रयोगशाळा तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
पंपावरील इंधन विक्री बंद
घटनेनंतर विहिरीच्या परिसरातील सुरू असलेल्या पेट्रोल पंपावरील इंधन विक्री तात्पुरती बंद करण्यात आली आहे. भूमिगत इंधन टाक्या रिकाम्या करण्याचे काम सुरू असून, त्यानंतर टाक्यांमध्ये गळती आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. तसेच विहिरीतील पाण्याचा उपसाही करण्यात आला आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनाही तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाण्याचे नमुने तपासल्यानंतर तसेच पेट्रोल पंपाच्या भूमिगत टाक्यांची पाहणी केल्यानंतर या धक्कादायक प्रकाराचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
अजयकुमार नष्टे, प्रांताधिकारी, जत






