डॉ. अशोक बालगुडे

पुणे: नवले पुलाजवळ किरकोळ अपघात झाल्यानंतर मराठी मालिकेतील अभिनेत्रीशी अरेरावी आणि गैरवर्तन करून तिला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नऱ्हे पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (११ सप्टेंबर) रात्री संबंधित अभिनेत्री मोटारीने मुंबईहून साताऱ्याच्या दिशेने जात होती. नवले पुलाजवळ तिच्या मोटारीचा किरकोळ अपघात झाला. त्यानंतर दुसऱ्या मोटारीतील दोघांनी घटनास्थळी येत तिच्याशी अरेरावी केली. गैरवर्तन केल्यानंतर दोघेही मोटारीतून पसार झाले.

या प्रकारामुळे घाबरलेल्या अभिनेत्रीने नऱ्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तसेच घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारित करून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. किरकोळ अपघाताचे निमित्त करून महिलेशी अरेरावी करणे गंभीर असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचे तिने म्हटले आहे.
अपघात किरकोळ; दहशत गंभीर!
रस्त्यावर वाहनांचा अपघात होणे ही दुर्दैवी बाब असली, तरी त्याचे निमित्त करून महिलेशी गैरवर्तन करण्याचा अधिकार कोणालाही नाही. नवले पूल परिसरातील या घटनेमुळे वाहनचालकांच्या बेशिस्तीबरोबरच रस्त्यावरील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत असून, या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.






