डॉ. अशोक बालगुडे

मुंबई, ता.14 : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला (व्हीएसआय) शासनाकडून मिळालेल्या अनुदानाचा वापर केवळ संशोधनासाठीच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त संस्थेने स्वनिधीतून तब्बल ५३ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च संशोधनासाठी केल्याचे साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे अनुदानाच्या विनियोगाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे.

वर्षभरापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीएसआयला दिलेल्या शासकीय अनुदानाचा हिशेब घेण्याची घोषणा केली होती. राज्यातील साखर कारखान्यांकडून गाळप झालेल्या प्रत्येक टन उसामागे एक रुपया कपात करून ही रक्कम संस्थेला दिली जाते. या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली.

समितीने सर्व आर्थिक बाबींची छाननी करून ८ जुलै २०२६ रोजी शासनाला अहवाल सादर केला. अहवालानुसार, २००९-१० ते २०२४-२५ या कालावधीत व्हीएसआयला शासनाकडून एकूण १३१.३५ कोटी रुपयांचे सहाय्यक अनुदान मिळाले. मात्र संस्थेने याच कालावधीत संशोधनावर एकूण ३४८.५५ कोटी रुपये खर्च केले.
यामध्ये १८४.३८ कोटी रुपये मूलभूत संशोधनासाठी, तर १६४.१७ कोटी रुपये सहयोगी संशोधनासाठी खर्च करण्यात आले. म्हणजेच शासनाकडून मिळालेल्या अनुदानापेक्षा सुमारे ५३.०३ कोटी रुपये अधिक रक्कम संस्थेने स्वतःच्या गंगाजळीतून संशोधनासाठी खर्च केली, असे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
व्हीएसआय ऊस आणि साखर उद्योगाशी संबंधित संशोधनासाठी कार्यरत असून, या संशोधनाचा थेट फायदा राज्यातील शेतकरी आणि साखर कारखान्यांना होतो. त्यामुळे संस्थेच्या संशोधनासाठी झालेला खर्च आणि त्यातून निर्माण झालेले तांत्रिक ज्ञान याकडे केवळ अनुदानाच्या चौकटीतून न पाहता त्याचे व्यापक परिणाम तपासणे आवश्यक आहे.
‘व्हीएसआयच्या संशोधनासाठी शासनाच्या अनुदानापेक्षा संस्थेने स्वतःच्या निधीतून अधिक रक्कम खर्च केली आहे. संशोधनाचा थेट फायदा राज्यातील शेतकरी आणि साखर कारखानदारांना होत असून, चौकशी अहवालामुळे संस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे,’ असे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
या अहवालामुळे व्हीएसआयला मिळालेल्या शासकीय निधीचा विनियोग उद्देशानुसारच झाल्याचे स्पष्ट झाले असून, अनुदानाच्या वापराबाबत सुरू असलेल्या चर्चेलाही आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.






