अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar Crime) संगमनेर तालुक्यात घडलेल्या ॲसिड हल्ल्याच्या घटनेने राज्यभरात भीती आणि संतापाचे (Sangamner News) वातावरण निर्माण झाले आहे. वडगावपान येथील इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर 15 मार्च रोजी अज्ञात तरुणाने ॲसिड फेकल्याची घटना घडली. तीन दिवस उलटूनही आरोपी फरार असल्याने पोलिसांवर दबाव वाढला असून आता संशयिताचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर मुलगी नेहमीप्रमाणे घरी जात असताना अचानक एक युवक तिच्यासमोर आला आणि तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. अनपेक्षित हल्ल्यामुळे मुलगी गंभीर जखमी झाली. तिच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले आणि तिला तातडीने लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्या चेहऱ्यावर सुमारे 7 टक्के भाजल्या जखमा असून उपचार सुरू आहेत.
या प्रकरणातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे हल्लेखोर अद्याप ओळखीचा नसून त्याचा हेतूही स्पष्ट झालेला नाही. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे संशयिताचे रेखाचित्र तयार करून सार्वजनिक करण्यात आले आहे. या व्यक्तीला ओळखत असल्यास किंवा तो कोठेही दिसल्यास संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
संगमनेर तालुक्यात काही दिवसांतच महिलांवर झालेल्या सलग हिंसक घटनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांपूर्वीच लग्नाला नकार दिल्याने एका तरुणीवर हल्ला झाला होता. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.







