सांगली: सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे (उप-आयुक्त, वर्ग-१ सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका, वय-३१ वर्षे, रा. ग्रिन एकर्स, फ्लॅट नं.४०३, धामणी रोड सांगली) यांच्या विरुद्ध २४ मजली इमारतीचा बांधकाम परवाना मंजुर करण्याकरता 7 लाख रुपयांची लाच मागीतल्या बाबत विश्राम बाग पोलिस ठाणे, सांगली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या २४ मजली इमारतीचा बांधकाम परवाना मंजुर करण्याकरीता आरोपी उप-आयुक्त, लोकसेवक वैभव साबळे, यांनी तक्रारदार यांचेकडे १० लाख रूपयांच्या लाचेची मागणी केल्याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी १७ फेब्रूवारी २०२५ रोजी पथकास दिला होता.
तक्रारदार यांनी देलेल्या अर्जाच्या अनुषंगाने २५ फेब्रूवारी २०२५ रोजी उप-आयुक्त आरोपी लोकसेवक वैभव साबळे, यांची ‘एसीबी’ने पडताळणी केली असता, तक्रारदार यांच्या कंपनी मार्फत घेण्यात आलेल्या २४ मजली इमारतीचा बांधकाम परवाना मंजुर करण्याकरीता, तक्रारदार यांचेकडे १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती ७ लाख रूपयांची लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

त्या अनुषंगाने आरोपी लोकसेवक वैभव साबळे (उप-आयुक्त, वर्ग-१ ) यांच्या विरूध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई, पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी, (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल कटके (पोलीस उप अधीक्षक, सांगली), उमेश पाटील (तत्कालीन पोलीस उप-अधीक्षक, सांगली), पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, पोलीस निरीक्षक, किशोर कुमार खाडे, तसेच पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, सीमा माने, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, अतुल मोरे, चंद्रकांत जाधव, विणा जाधव यांच्या सापळा पथकाने केली आहे.







