अहिल्यानगर : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरात एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेशनगर परिसरातील एका घरात विवाहित महिला आणि तिच्या दोन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृतांमध्ये वंदना गणेश गाडे (वय 35), चैतन्य गणेश गाडे (वय 7) आणि जीवन गणेश गाडे (वय 3) यांचा समावेश आहे. सोमवारी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गणेश गाडे घरी परतल्यानंतर त्यांना हा प्रकार दिसून आला. त्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घराची पाहणी करून पंचनामा केला. पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थितीची माहिती घेतली.

आई आणि तिच्या दोन लहान मुलांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक स्तरावर काही शक्यता व्यक्त केल्या जात असल्या तरी पोलिसांनी मृत्यूचे कारण अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. त्यामुळे हा प्रकार नेमका कशामुळे घडला, याचा तपास सध्या सुरू आहे.
घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घराबाहेर गर्दी केली. अवघ्या 7 आणि 3 वर्षांच्या मुलांचा मृत्यू झाल्याने या घटनेने स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांकडून घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि इतर संबंधित बाबींची तपासणी केली जात आहे. मृत्यूचे खरे कारण तपासातूनच स्पष्ट होणार असून, सध्या कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरणार आहे. या घटनेमुळे देवळाली प्रवरा शहरावर शोककळा पसरली आहे.






