पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी सरकारवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले. मराठा आरक्षणाचा प्रश्न तडीस नेण्यासाठी सरकारला 90 दिवसांची मुदत दिलेल्या जरांगे पाटील यांनी, मागील 15 दिवसांत सरकारने आपल्या जवळच्या लोकांनाच फोडल्याचा थेट दावा केला आहे.

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना त्यांनी, गरज भासल्यास पूर्ण महाराष्ट्र बंद पाडू असा इशाराही दिला. त्यानंतर ते म्हणाले की, “माझ्या जवळच्या काही लोकांनीच मला धोका दिला आहे. त्यांची किंमत अवघी दीड लाख रुपये इतकीच ठरली. तरीसुद्धा मी गरिबांसाठी आणि मराठा समाजाच्या न्यायासाठी हा लढा सुरूच ठेवणार आहे.” आपल्या जवळच्या सहकाऱ्यांनी अशा प्रकारे वागावे, अशी अपेक्षा नव्हती, असे सांगत त्यांनी या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला.

अंतरवाली सराटी या गावाने समाजाच्या संघर्षात मोठे योगदान दिले आहे, त्यामुळे तिथल्या लोकांबद्दल किंवा ललिता तारख यांच्याबद्दल आपण कोणतेही चुकीचे विधान करणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. “ज्यांनी धोका दिला ते आपलेच लोक आहेत आणि त्यांना एक दिवस नक्कीच आपल्या चुकीचा पश्चात्ताप होईल. योग्य वेळ आल्यावर सर्वांची नावे पुराव्यासहित समोर आणू,” असा इशारा त्यांनी दिला.

या कठीण प्रसंगात मराठा समाजाने संयम राखावा आणि एकजूट दाखवावी, असे आवाहन जरांगे यांनी केले. तसेच सध्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने सामना करावा आणि कोणतेही टोकाचे पाऊल न उचलता आत्महत्या करू नये, अशी भावनिक सादही त्यांनी घातली.







