Crime News: सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील टाकळी परिसरात छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या हत्येचा उलगडा सांगली स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. या प्रकरणात मयत महिलेचा दुसरा पती आणि सासऱ्याने मिळून तिची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या दोघांना वेगवेगळ्या राज्यांतून अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिरजमधील टाकळी येथे एका उसाच्या शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत विदारक होती. सुरुवातीला महिलेची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तपासादरम्यान मृतदेहाच्या काही अंतरावर एक रेल्वे तिकीट सापडले. याच तिकिटाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची दिशा निश्चित केली.
तपासात मयत महिलेची ओळख नीतू उर्फ शालिनी यादव अशी पटली. ती उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील रहिवासी होती. नीतू ही पहिल्या पतीपासून वेगळी झाली होती. त्यानंतर तिची ओळख आकाश उर्फ विशाल दीनदयाळ यादव याच्याशी झाली होती. दोघांनी कुटुंबाला न सांगता विवाह केला होता. विवाहानंतर घरगुती वाद वाढले होते. या वादातून नीतूने पतीविरोधात पोलीस तक्रारही दाखल केली होती.
या तक्रारीचा राग आकाश याच्या मनात होता. पत्नीच्या वागणुकीला आणि चारित्र्याच्या संशयाला कंटाळून आकाश याने वडील दिनदयाळ रामबाली यादव यांच्यासोबत नीतूला संपवण्याचा कट रचला. 16 डिसेंबर 2025 रोजी दोघांनी नीतूला उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथून रेल्वेने सांगलीच्या मिरज तालुक्यातील टाकळी येथे आणले. त्यानंतर शॉलने गळा आवळून तिची हत्या करण्यात आली.
हत्या केल्यानंतर दोघे पुन्हा रेल्वेने उत्तर प्रदेशकडे पळून गेले. घटनास्थळी सापडलेल्या रेल्वे तिकिटाच्या आधारे आणि मिरज रेल्वे स्थानकाबाहेरील एका चिक्की विक्रेत्याकडे झालेल्या आर्थिक व्यवहाराच्या तपासातून पोलिसांनी आरोपींचा माग काढला. स्थानिक गुन्हे शाखेने आकाश उर्फ विशाल याला हरियाणामधून आणि दिनदयाळ यादव याला उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.






