नाशिक: अध्यात्म आणि ज्योतिषाच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि जमिनी हडपणाऱ्या भोंदू अशोक खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ खरात याच्या पापकर्माचा घडा अखेर भरला आहे. नाशिक पोलिसांनी या भोंदूला बेड्या ठोकल्यानंतर आता या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची कडी असलेला त्याचा पीए आणि ऑफिसबॉय नीरज जाधव यालाही क्राईम ब्रँचने जेरबंद केले आहे. नीरजच्या अटकेमुळे राज्यातील अनेक बड्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

अशोक खरात हा नाशिक-शिर्डी पट्ट्यात स्वतःला मोठा ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु म्हणवून घ्यायचा. मात्र, या बुरख्याआड त्याने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केवळ एवढेच नाही, तर राजकीय वरदहस्त वापरून त्याने शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या आणि धमकावल्याचेही आरोप आहेत.
नीरज जाधव हा खरातचा सावलीसारखा सोबती होता. खरातचे आर्थिक व्यवहार, डील्स आणि गुपिते नीरजला ठाऊक आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, लैंगिक शोषणाचे अनेक व्हिडिओ नीरजकडे असल्याचे बोलले जात आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून, त्याच्याकडून मिळणारी माहिती या प्रकरणाला वेगळे वळण देऊ शकते.
या प्रकरणाचे पडसाद आता थेट मंत्रालयापर्यंत उमटले आहेत. मंत्रिमंडळातील तब्बल 9 मंत्र्यांचे खरातशी थेट संबंध होते. मात्र, नीरज जाधवच्या जबाबाने अनेक मंत्र्यांची आणि आमदारांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. आता हे खरात प्रकरण काय वळण घेणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.







