पुणे: पुणे शहराच्या दक्षिण भागातील (Pune News) वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महापालिकेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. स्वारगेट ते कात्रज या नियोजित मेट्रो मार्गाचा विस्तार आता थेट शिवापूर टोलनाका आणि प्रस्तावित रिंगरोडपर्यंत करण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला शहर सुधारणा समितीने मंजुरी दिली आहे. यामुळे भविष्यात साताऱ्याच्या दिशेने जाणारा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे.

कात्रज आणि शिवापूर टोलनाका परिसरात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे दररोज भयानक वाहतूक कोंडी होते. तासनतास अडकून पडणारे प्रवासी आणि वाढते प्रदूषण ही या भागातील मोठी समस्या बनली आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरसेविका वर्षा तापकीर आणि तेजश्री बदक यांनी मेट्रो विस्ताराचा प्रस्ताव मांडला होता.
पुणे शहराभोवती होणाऱ्या प्रस्तावित रिंगरोडपर्यंत मेट्रो पोहोचल्यास, शिवापूर ते स्वारगेट हे अंतर पार करण्यासाठी सध्या १ तास लागतो, मेट्रोमुळे हेच अंतर अवघ्या २० मिनिटांत कापता येईल. कात्रज, आंबेगाव, खेड शिवापूर या परिसरात गृहप्रकल्पांचे जाळे वेगाने पसरत आहे. या भागातील नोकरदार वर्गाला मेट्रोमुळे हक्काचे आणि स्वस्त सार्वजनिक साधन मिळेल.
शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा स्मिता वस्ते यांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर, आता हा प्रस्ताव महापालिकेच्या ‘मुख्य सभे’कडे अंतिम निर्णयासाठी पाठवण्यात आला आहे. तिथून हिरवा कंदील मिळाल्यावर राज्य आणि केंद्र सरकारकडे निधीसाठी पाठपुरावा केला जाईल.







