नाशिक: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात प्रकरण (Ashok Kharat Case) अधिकच गंभीर होत चालले असून, आधीच अटकेत असलेल्या खरातविरोधात आता आणखी एक नवीन (Nashik News) गुन्हा दाखल झाला आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या या तक्रारीमुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Marathi News)

तक्रारीनुसार, पीडित महिला गर्भवती असताना ‘पूजा विधी’च्या नावाखाली तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, या वेळी महिलेच्या पतीला बाहेर बसवून आतमध्ये ‘उपचार’ किंवा ‘विधी’च्या नावाखाली हा प्रकार केल्याचे सांगितले जात आहे. तसेच, या घटनेची माहिती कोणालाही दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, इतर महिलाही आता पुढे येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, किमान तीन महिलांनी तक्रार नोंदवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांना विश्वासात घेऊन विशेष तपास पथकाकडून गोपनीय पद्धतीने चौकशी सुरू आहे. त्यांच्या जबाबांची नोंद अत्यंत संवेदनशीलतेने केली जात असून, यामुळे तपासाला नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या प्रकरणांमध्ये एक ठरावीक पद्धत दिसून येत असल्याची चर्चा आहे. श्रद्धा, भीती आणि तथाकथित धार्मिक विधी यांचा आधार घेत महिलांना जाळ्यात ओढले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या नव्या गुन्ह्यामुळे खरातविरोधातील पुरावे अधिक बळकट होण्याची शक्यता असून, तपासाचा वेगही वाढला आहे. पुढील काही दिवसांत आणखी तक्रारी आणि खुलासे समोर येण्याची शक्यता असल्याने हे प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे.






