Mumbai Pune bullet train: मुंबई : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी केंद्र सरकारकडून मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पानंतर आता राज्यात आणखी 2 हाय-स्पीड बुलेट ट्रेन मार्ग विकसित करण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद या मार्गांना प्राधान्य देण्यात आले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत ही माहिती दिली.

या नव्या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. नियोजनानुसार मुंबई ते पुणे हे अंतर केवळ 48 मिनिटांत पूर्ण होऊ शकते. सध्या याच प्रवासासाठी सुमारे 3 ते 4 तास लागतात. तसेच पुणे ते हैदराबाद हा प्रवास अंदाजे 2 तासांत पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. या बदलामुळे आयटी आणि औद्योगिक क्षेत्राला मोठी मदत मिळणार आहे.
दरम्यान, मुंबई उपनगरीय रेल्वे व्यवस्थेसाठीही मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. सुमारे 3000 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले असून 238 नवीन स्वयंचलित दरवाजे असलेल्या गाड्यांची निर्मिती सुरू आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेत आणि सोयींमध्ये वाढ होणार आहे.
राज्यात मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनची मागणीही अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र सध्या पुणे-मुंबई आणि पुणे-हैदराबाद या मार्गांना प्राधान्य दिल्यामुळे विदर्भातील प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. नागपूर मार्गाबाबत स्पष्टता कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याचबरोबर देशातील पहिल्या समुद्राखालील सुमारे 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच 17 नद्यांवरील पुलांचे कामही प्रगतीपथावर आहे. यापैकी 7 पैकी 5 किलोमीटर बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रवास अधिक वेगवान आणि आधुनिक होणार आहे.






