नांदेड: नांदेड शहराच्या गुन्हेगारी जगतातील वर्चस्वाच्या लढाईमुळे (Crime News) 3 जणांची हत्या करण्यात आली आहे. शहरातील गजबजलेल्या डी-मार्ट आणि ई-स्क्वेअर परिसरात झालेल्या गँगवारमध्ये तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, यातील एक हत्या थेट सरकारी रुग्णालयाच्या अपघात विभागात घुसून करण्यात आल्याने नांदेडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुख्यात ‘सदा’ टोळीचा प्रमुख अर्जितसिंग चव्हाण (वय २५) हा साथीदारांसह शुक्रवारी रात्री ‘धुरंधर-2’ हा चित्रपट पाहायला गेला होता. तो कॅनॉल रोडवरून जात असताना, प्रतिस्पर्धी ‘साई लाला’ टोळीने त्याच्यावर हल्ला केला. तलवारी आणि खंजीरने केलेल्या या हल्ल्यात अर्जितसिंगचा जागीच मृत्यू झाला. या संघर्षात प्रतिस्पर्धी टोळीचे मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेझ हे देखील गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर पोलिसांनी जखमी अरबाज आणि आवेझ यांना तातडीने विष्णूपुरी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, ही माहिती मिळताच मृत अर्जितसिंगचा भाऊ प्रदीप चव्हाण याने भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याने पोलीस बंदोबस्ताची तमा न बाळगता थेट कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये प्रवेश केला. तिथे उपचार घेत असलेल्या सय्यद आवेझवर प्रदीपने चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात आवेझचाही मृत्यू झाला, तर दुसरा जखमी अरबाज याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
‘सदा’ आणि ‘साई लाला’ या दोन टोळ्यांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वर्चस्ववादातून धुसफूस सुरू होती. दोन्ही गटातील सदस्यांवर यापूर्वी मोक्का (MPDA) आणि तडीपारीची कारवाई झाली होती. मात्र, जुन्या वैमनस्याचा राग मनात धरून साई लाला टोळीने अर्जितचा काटा काढण्याचे नियोजन केले होते.
तिहेरी हत्याकांडामुळे नांदेड शहर हादरले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. भाग्यनगर पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 8 संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.







