परभणी: परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात आज शनिवारी दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. कीर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू असताना मंदिराचा मुख्य सभामंडप अचानक पत्त्यासारखा कोसळला. या दुर्दैवी घटनेत 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, ढिगाऱ्याखाली सुमारे ४० भाविक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शनिवारचा दिवस असल्याने मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. अचानक छत आणि खांब कोसळल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. मंदिराचा रस्ता अरुंद असल्याने बचावकार्यात सुरुवातीला अडथळे आले, परंतु प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू केले आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण परभणी परिसरात शोककळा पसरली आहे.

मंदिराचा रंजक इतिहास आणि श्रद्धा
यशवाडी येथील हे हनुमान मंदिर अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते. या गावाचा इतिहास सुमारे ३०० ते ४०० वर्षांपूर्वीचा आहे. एका आख्यायिकेनुसार, पूर्वी या गावात मुक्कामाला थांबणाऱ्या पाहुण्यांचा मृत्यू होत असे, त्यामुळे या गावाला ‘ओस पडलेली वाडी’ असे म्हटले जात असे. नंतरच्या काळात गावकऱ्यांनी येथे काळ्या पाषाणातील त्रिमूर्ती हनुमानाची स्थापना केली आणि गावाला ‘यशवाडी’ हे नाव प्राप्त झाले. २०११ पासून येथे दर शनिवारी नियमितपणे कीर्तन आणि महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
सध्या घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी, पोलीस आणि स्थानिक नागरिक मदत कार्यात गुंतले आहेत. ढिगाऱ्याखाली अजून किती भाविक अडकले आहेत, याचा शोध घेतला जात आहे. बचावकार्य पूर्ण होईपर्यंत परिसर सुरक्षित करण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.






