बीड: बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात एका (Shocking News) लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. (Beed News) शहरातील व्यंकटेश लॉजमधील रूम क्रमांक 205 मध्ये हा प्रकार उघडकीस आला. (Majalgaon News)

कृष्णा डाके (रा. नित्रुड, ता. माजलगाव, जि. बीड) यांनी 15 तारखेला लॉजमध्ये खोली बुक केली होती. त्यानंतर ते बाहेर न आल्याने लॉज कर्मचाऱ्यांना संशय आला. काही दिवसांनी खोलीतून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने व्यवस्थापनाने परिस्थितीची गंभीर दखल घेतली.
20 तारखेला दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर तो उघडण्यात आला. आत पाहणी केली असता कृष्णा डाके यांचा मृतदेह खोलीत आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार मृतदेह 3 ते 4 दिवसांपासून खोलीत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. आत्महत्या, अपघाती मृत्यू किंवा अन्य काही कारण याबाबत अद्याप अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.
या घटनेमुळे शहरात विविध चर्चा सुरू असून लॉज व्यवस्थापनाच्या नोंदवहीची तपासणी, सीसीटीव्ही फुटेज आणि मृत व्यक्तीच्या हालचालींचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.







