संभाजीनगर: कौटुंबिक तणावाचा मुलांच्या मनावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो, हे संभाजीनगरमधील खवड्या डोंगर प्रकरणातून समोर आले आहे. या घटनेत आई, वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरुवातीला या प्रकरणात आयफोनचा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र, आता कुणालच्या मित्राने केलेल्या खुलाशामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

कुणालला आयफोन हवा होता आणि त्याच कारणामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा सुरुवातीला होती. मात्र, त्याच्या मित्राने हा दावा फेटाळला आहे. कुणालने काही दिवस आधीच आयफोन घेतला होता. त्यामुळे मोबाईलसाठी त्याने असे पाऊल उचलले, असे म्हणणे योग्य नसल्याचे त्याच्या मित्राने सांगितले.

घटनेच्या दिवशीही कुणाल नेहमीप्रमाणे दुकानात आला होता. त्याने दूध आणि काही वस्तू खरेदी केल्या होत्या. त्यावेळी त्याच वागण नीट वाटत नव्हते असे मित्राने सांगितले.

मात्र, कुणालने घटनेच्या दिवशी सकाळी सुमारे 10 वाजता Instagram वर एक Note पोस्ट केली होती. त्यामध्ये त्याने ‘I am sorry everyone’ असा संदेश लिहिला होता. ही Note त्याच्या मित्रांच्या यादीतील लोकांना दिसत होती. मित्राने ही पोस्ट सायंकाळी सुमारे 5 वाजता पाहिल्यानंतर त्याला घटनेची माहिती समजल्याचे सांगितले.
कुणालच्या काकांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबात अधूनमधून पती-पत्नीमध्ये मतभेद होत होते; दरम्यान, याचाच परिणाम कुणालवर झाला असल्याची शक्यता आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही चांगली होती. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून आयफोनही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. Instagram Note आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे घटनेमागील नेमके कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.







