छत्रपती संभाजीनगर: मित्रत्वाच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीची छेड काढणाऱ्या मित्राला एका तरुणाने दारू पाजून निर्दयीपणे संपवले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

मृत तरुणाचे नाव आवेश परवेज शेख (वय 25) असून, आरोपी मित्राचे नाव फैयाज महेमूद शेख (वय 26, रा. किराडपुरा) असे आहे. घटना अशी की, २५ मे रोजी कच्ची घाटी परिसरात एक मृतदेह आढळून आला होता. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, मृत आवेश हा शेवटचा फैयाजसोबत होता. पोलिसांनी सापळा रचून किराडपुरा येथून फैयाजला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच फैयाजने गुन्हा कबूल केला.

“चौकशीदरम्यान आरोपीने कबूल केले की, आवेश अनेक दिवसांपासून त्याच्या पत्नीची छेड काढून त्रास देत होता. अनेकदा समज देऊनही तो आपल्या वागण्यात बदल करत नव्हता. या प्रकारामुळे फैयाजच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली होती. २५ मे च्या सकाळी, फैयाजने आवेशला आपल्या दुचाकीवर बसवून एका निर्जन ठिकाणी नेले. तिथे दोघांनी मिळून मद्यप्राशन केले. नशेत असताना पुन्हा एकदा पत्नीचा विषय निघाल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात फैयाजने रस्त्यावरील मोठा दगड उचलून आवेशच्या डोक्यावर प्रहार केला, ज्यामुळे तो गंभीररीत्या घायाळ झाला.”
इतक्यावरच न थांबता, फैयाजने जखमी अवस्थेतील आवेशला दुचाकीवरून कच्ची घाटी येथे निर्जन ठिकाणी फेकून दिले. भर उन्हात पाणी न मिळाल्यामुळे आणि गंभीर दुखापतीमुळे आवेशचा तडफडून मृत्यू झाला. तो मृत असल्याची खात्री पटल्यावरच आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले होते.







