जालना: जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील ‘बिस्मिल्ला’ हॉटेलमध्ये बिलावरून वाद होऊन चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेल मालक आणि एका कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. कदीम जालना पोलीस ठाण्यात दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकास अटक करण्यात आली आहे, तर दुसरा अद्याप फरार आहे.

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश मोरे हा आपल्या एका साथीदारासह ‘बिस्मिल्ला’ हॉटेलमध्ये जेवणासाठी आला होता. त्यांचे जेवण झाल्यानंतर हॉटेल मालक मन्सूर खान आणि त्याचा सहकारी फरदीन खान यांनी मोरे याच्याकडे बिल मागितले. तेंव्हा अविनाश मोरेने बिल देण्यास नकार दिला. या कारणावरून वाद झाला जो नंतर हातघाईपर्यंत पोहोचला.
वाद विकोपाला गेल्यानंतर, अविनाश मोरे आणि त्याच्या साथीदाराने धारदार शस्त्राने मन्सूर खान आणि फरदीन खान यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हल्ल्यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी धाडस दाखवत एका आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनास्थळी दाखल झालेल्या कदीम जालना पोलिसांनी मुख्य आरोपी अविनाश मोरे याला ताब्यात घेतले. मात्र त्याचा साथीदार घटनेनंतर पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून, कदीम जालना पोलीस अधिक तपास करत आहेत. हॉटेलमध्ये सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. हल्ल्याचे नेमके कारण आणि आरोपींची पार्श्वभूमी याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे.







