इचलकरंजी : पत्नीसोबत जवळीक वाढल्याने मित्रानेच वरवंट्याने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून, हत्येमागे आणखी काय कारण आहे का? याचा शोध घेत आहेत.

ही घटना शहापूर येथे १६ ऑगस्ट रोजी घडली. विनोद आण्णासो घुगरे (वय 32, रा. गल्ली नं. 3, गणेशनगर, शहापूर) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर संतोष दशरथ उर्फ वसंत पागे उर्फ नागणे (वय 38) आणि संजय दशरथ पागे (वय 36, दोघे रा. गल्ली नं. साडेतीन, गणेशनगर, शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावं आहे.
पोलिसांनी या घटनेविषयी माहिती देताना सांगितले की, ‘आरोपी संतोष पागे आणि हत्या झालेला विनोद घुगरे हे दोघेही चांगले मित्र होते. विनोद हा संतोषच्या घरी नेहमी यायचा. अशातच विनोद आणि संतोषची पत्नी यांच्यात संवाद वाढला. विनोद आपल्या पत्नीच्या नादाला लागला या कारणावरून रागाच्या भरात संतोष आणि त्याच्या सोबत असलेला संजय दोघांनी मिळून विनोदच्या डोक्यावर दगडी वरवंट्याने प्राणघातक हल्ला केला. ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, पोलिसांनी आता दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून, पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे.







