छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून हत्येची घटना समोर आली आहे. बिअर बारला संरक्षण देण्यावरून निर्माण झालेल्या वर्चस्वाच्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याचा आरोप आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला कारने मागून धडक दिली. त्यानंतर आरोपी पुन्हा घटनास्थळी आला आणि त्याने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. तरुणाचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर आरोपी सिडको पोलीस ठाण्यात हजर झाला.

देवेश उर्फ बंटी चंद्रेश दीक्षित (वय ३४, रा. एन-७) असे मृत तरुणाचे नाव असून, पवन पाराशर असे आरोपीचे नाव आहे. गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास एन-७ रोडवरील एसबीआय बँकेसमोर ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा..
https://www.instagram.com/reel/De03zHZRiZf/?utm_source=ig_web_copy_link&vrfl=NTc4MTIwNjQ2YQ==

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पवन पाराशर याचा सुमारे दहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. काही काळ तो नियमित काम करत असल्याची चर्चा होती. मात्र, महिनाभरापूर्वी त्याच्या वागण्यात बदल झाल्याने पत्नी माहेरी गेल्याचे सांगितले जाते. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नांतून त्याचे वाद वाढल्याची माहिती समोर आली आहे.
पवन आणि बंटी हे एकमेकांच्या परिचयाचे होते. मात्र, काही काळापासून त्यांच्यात व्यावसायिक कारणांवरून संघर्ष सुरू होता. दांडिया आणि रावणदहन कार्यक्रमादरम्यानही दोघांमध्ये वाद आणि शिवीगाळ झाल्याचे सांगितले जाते. याच वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेचे नियोजन करण्यात आल्याचा आरोप आहे. पवनच्या एका नातेवाइकाने आणि साथीदाराने त्याला साथ देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून, हत्येमागील नेमके कारण आणि इतर संबंधित व्यक्तींची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.






