Crime News: नांदेड: नांदेड Nanded Crime जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. मुदखेड तालुक्यातील जवळा मुरहार गावात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेत आई-वडील घरात मृतावस्थेत (Death)आढळून आले असून दोन मुलांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. Four Members One Family Died

या घटनेत रमेश सोनाजी लखे वय 51 आणि त्यांची पत्नी राधाबाई रमेश लखे वय 45 यांचा मृत्यू झाला आहे. तसेच त्यांचे दोन मुलगे उमेश लखे आणि बजरंग लखे यांचाही मृत्यू झाला आहे. जवळा मुरहार गावातील लखे कुटुंबावर हा मोठा आघात ओढावला आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचा असा अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, लखे कुटुंबातील दोन्ही मुलांनी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या घरी भेट दिली असता आई-वडील घरातील पलंगावर मृतावस्थेत आढळून आले. यामुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. एकाच वेळी घडलेल्या या घटनांमुळे गावकरी आणि पोलीस प्रशासनही चक्रावून गेले आहे.
आई-वडिलांचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की त्यांचा घातपात करण्यात आला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. तसेच आधी मुलांनी आई-वडिलांचा जीव घेतला आणि नंतर स्वतः आत्महत्या केली, असा संशयही व्यक्त केला जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी पोलिसांकडून करण्यात आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच मुदखेड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. या प्रकरणातील नेमके सत्य पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे जवळा मुरहार गावात शोकाचे वातावरण असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.





