छ. संभाजीनगर: छ. संभाजीनगर (Chh. Sambhajinagar News) जिल्ह्यातील कन्नड परिसरात एका महिला शिक्षिकेने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवल्याची अत्यंत दुःखद घटना घडली आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी मुलाला पैसे पाठवले होते. वैशाली शेलार असे या ४७ वर्षीय महिलेचे नाव असून त्या स्थानिक जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. २४ डिसेंबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली, ज्यामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली यांचा मुलगा पुण्यात राहून शिक्षण घेतो. त्याच्या मोबाईलवर अचानक बँक खात्यात ७५००० रुपये जमा झाल्याचा संदेश आला. आईने अचानक इतकी मोठी रक्कम का पाठवली असावी, या विचाराने तो घाबरला. त्याने त्वरित वडिलांशी संपर्क साधला आणि त्यांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले. जेव्हा त्याचे वडील घरी पोहोचले, तेव्हा त्यांना घराचा दरवाजा आतून लावलेला दिसला. दरवाजा उघडल्यानंतर वैशाली यांनी घरात गळफास घेतलेला पाहून त्यांना मोठा धक्का बसला.
घरामध्ये सर्व काही सुरळीत वाटत असताना त्यांनी हे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप कोणालाही समजलेले नाही. पोलीस आता या आत्महत्येमागचे नेमके कारण काय असावे, याचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.






