बीड: बीड जिल्ह्यातील तेलगाव येथे किरकोळ (Crime News) कारणावरून एका हॉटेलमधील वेटरला चौघांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संपूर्ण (Beed News) मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. जखमी तरुणावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलगाव येथील चौकात असलेल्या त्रिमूर्ती ज्यूस सेंटरमध्ये सागर विजय जाधव हा तरुण वेटर म्हणून काम करतो. नेहमीप्रमाणे तो हॉटेलमधील काम करत असताना ही घटना घडली. सागर जाधव रिकामे ग्लास जिन्यावरून खाली आणत असताना जिन्याजवळ काही तरुण उभे होते. पुढे जाण्यासाठी जागा मिळावी म्हणून त्याने त्या तरुणांना “पायरीवरून थोडे बाजूला व्हा” असे सांगितले.
मात्र या साध्या बोलण्याचा गैरसमज करून एका तरुणाने सागर जाधवला अडवले आणि त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. संबंधित तरुणाने सागरला ज्यूस सेंटरच्या बाहेर खेचले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्यासोबत असलेल्या इतर तिघांनीही सागरला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या मारहाणीत सागर जाधव गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. किरकोळ कारणावरून तरुणाला अशा प्रकारे मारहाण केल्यामुळे कायद्याचा धाक उरला आहे का, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित तरुणांविरोधात कारवाई करण्याची मागणी होत असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.







