नांदेड: आंतरजातीय (Crime News) प्रेमसंबंधांमुळे एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सक्षम ताटे (वय 20) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रेयसी आंचल मामीडवार हिच्या कुटुंबीयांनीच तरुणाची निर्घृण हत्या केली आहे.

आंचल मामीडवार आणि सक्षम गेल्या 3 वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. मात्र, जात वेगळी असल्याने आंचलचे वडील गजानन मामीडवार आणि भाऊ हिमेश व साहिल मामीडवार यांना हे संबंध मान्य नव्हते.
आंचलच्या कुटुंबीयांनी सक्षमला गोड बोलून इटवारा परिसरात बोलावले. नशेच्या अवस्थेत असताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, गोळी लागूनही तो वाचल्याचे पाहून आरोपींनी त्याच्या डोक्यात फरशी आणि दगड घालून त्याची निर्घृणपणे हत्या केली.
समोर आलेल्या माहितीनुसार, सक्षम आणि आंचल या दोघांचीही कौटुंबिक पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती. सक्षम जेलमधून नुकताच सुटून आल्यामुळे आंचलच्या कुटुंबीयाने त्याच्या हत्येचा कट रचला होता. या हत्याकांडानंतर, आंचलने तिच्या कुटुंबीयांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
सक्षमचा मृतदेह त्याच्या घरी आणल्यावर आंचलने आपल्या प्रेमाची कबुली देत, मृतदेहासोबत लग्नाचे विधी पार पाडल्या. तिने सक्षमच्या मृतदेहाला आणि स्वतःच्या अंगाला हळद लावली, कपाळावर त्यांच्या नावाचे कुंकू लावले. “मी सक्षमची पत्नी आहे. आमचं प्रेम जिवंत आहे. तो नसला तरी आमचे प्रेम अमर आहे. मी मनाने कायम त्याच्यासोबत राहीन,” असे सांगत आंचलने आता आयुष्यभर सक्षमच्या घरी राहणार असल्याचे सांगितले आहे.






