जालना, ता. २ : गोद्री (ता. भोकरदन, जि जालना ) गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी केल्याच्या वादातून झालेल्या कथित हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. काही समाजकंटकांनी वस्तीवर धडक देत घरात घुसून महिला व पुरुषांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून, या हल्ल्यात एका चिमुकलीवर ॲसिड फेकण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोद्री गावात समाजबांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी केली होती. मात्र, या कार्यक्रमावरून काही व्यक्तींमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर संतप्त जमावाने संबंधित वस्तीवर धडक देत दगडफेक केली आणि काही घरांमध्ये घुसून मारहाण केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या हल्ल्यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे एका लहान मुलीवर ॲसिड फेकण्यात आल्याचा आरोप आहे.

या घटनेत चिमुकली गंभीररीत्या भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. निष्पाप बालिकेवर झालेल्या या हल्ल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. हल्लेखोरांनी महिलांसह अनेकांना मारहाण केल्याचेही सांगितले जात आहे. घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. ॲसिड हल्ल्यासारख्या गंभीर गुन्ह्याची सखोल चौकशी करून दोषींना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. या घटनेमुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाईची आवश्यकता पुन्हा अधोरेखित झाली आहे.






