Palghar Kashinath Chaudhary : पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांडानंतर भारतीय जनता पक्षाने ज्यांच्यावर मुख्य आरोपी म्हणून टीकेची झोड उठवली होती, त्या काशिनाथ चौधरी (Kashinath Chaudhary) यांनी रविवारी(16 नोव्हेंबर) नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या घडामोडीनंतर “भाजपने केलेले गंभीर आरोप अचानक कुठे गायब झाले?” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. (latest political news)

साधू हत्याकांड सहन न झाल्यानेच आम्ही बंड केले; शिंदे
गडचिंचले प्रकरणात साधूच्या हत्येस जबाबदार ठरवत भाजप नेत्यांनी चौधरी यांच्यावर थेट निशाणा साधला होता. त्यावेळी राज्यभरात या प्रकरणावरून राजकीय वादळ तयार करत तत्कालीन ठाकरे सरकारवर भाजपने अनेक आरोपांचा भडीमार केला होता. “साधू हत्याकांड सहन न झाल्यानेच आम्ही बंड केले,” असे विधान एकनाथ शिंदे यांनीही त्या वेळी केले होते.
मात्र, आता भाजपने ज्यांना आरोपीच्या कटघऱ्यात उभे केले होते, त्याच काशिनाथ चौधरींचे पक्षप्रवेश सोहळ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. डहाणू येथे खासदार हेमंत सावरा आणि जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत चौधरी यांनी भाजपची वाट धरली आहे. या वेळी 3 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
जमावाकडून निर्घृण हत्या
सुरतला जाणाऱ्या दोन साधू आणि त्यांच्या चालकाची 16 एप्रिल 2020 च्या रात्री गडचिंचले येथे जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी 200 जणांना अटक करून 108 साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. ही घटना महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडली होती, आणि त्यावरून भाजपने ठाकरे सरकारवर तीव्र टीका केली होती.
आता त्याच प्रकरणातील आरोपी ठरवण्यात आलेल्या व्यक्तीलाच भाजपने आपल्या पक्षात आश्रय दिल्याने विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा: मोठी बातमी ! शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; सामुहिक राजीनामे, टेन्शन वाढलं







