Panchayat Election 2025: भिगवण–शेटफळगढे जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला हे आरक्षण लागू असल्याने अनेकांनी आपल्या पत्नींसाठी उमेदवारीची हालचाल सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून विविध सामाजिक कार्यक्रम, होम मिनिस्टर स्पर्धा, हळदीकुंकू समारंभ आणि इतर उपक्रमांतून उमेदवार आपली उपस्थिती ठळक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

गटातील काही इच्छुक वैयक्तिक कार्यक्रमांनाही आवर्जून उपस्थित राहून लोकसंपर्क वाढवत आहेत. वास्तुशांती, जागरण-गोंधळ, वर्षश्राद्ध आणि समाजातील इतर कार्यक्रमांतून “पत्नी माझी लाडकी” या नावाखाली प्रचाराचा सूर उमटू लागला आहे. काही मोजक्या उमेदवारांनी आपल्या आईसाठी उमेदवारीचा विचार व्यक्त केला असला, तरी बहुतेक ठिकाणी पती पत्नीसाठीच तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
दरम्यान, या जिल्हा परिषद गटातील स्थानिक समस्या अजूनही कायम आहेत. सांडपाणी व्यवस्थापन, रस्त्यांची दुरवस्था आणि आरोग्याच्या सोयी यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत उमेदवारांना गावातील वास्तव समस्यांची कितपत जाणीव आहे, हा प्रश्न नागरिकांच्या मनात घर करत आहे.
हेही वाचा- पुणेकरांसाठी मोठी बातमी..! रस्त्यांवर लवकरच 1000 ई बस धावणार; केंद्रीय राज्यमंत्र्यांची माहिती..
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावरून प्रसिद्धी मिळवण्याची चढाओढ सुरू असली, तरी मतदार आता फक्त कार्यक्रमांतील उपस्थितीवर निर्णय घेणार नाही, तर खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या व्यक्तीलाच पसंती देईल.
“सोशल मीडियावरचे लाईक्स निवडणुकीत मतांत बदलतातच असे नाही; खऱ्या प्रश्नांवर काम करणारेच जनतेचे खरे लाडके ठरतात.”







