T20 World Cup 2026 : International Cricket Council (ICC) ने टी-20 वर्ल्ड कपमधील उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्यांची तिकीटविक्री सुरू केली आहे; मात्र सामने नेमके कुठे होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. भारत-पाकिस्तान राजकीय तणाव आणि संभाव्य सुरक्षा प्रश्नांमुळे स्पर्धेचे वेळापत्रक “फ्लोटिंग” ठेवण्यात आले आहे.

उपांत्य फेरीसाठी मुंबई, कोलकाता आणि कोलंबो ही तीन शहरे निश्चित करण्यात आली आहेत. मुंबईतील सामना Wankhede Stadium येथे होणार हे ठरले आहे. मात्र दुसरी उपांत्य लढत Eden Gardens किंवा R. Premadasa Stadium येथे होईल, हे सहभागी संघांवर अवलंबून असेल.
पेच असा की, पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहोचल्यास त्यांचा सामना 4 मार्च रोजी कोलंबोत खेळवण्याची तरतूद आहे. श्रीलंका उपांत्य फेरीत आली आणि तिचा प्रतिस्पर्धी भारत नसल्यास तो सामना देखील कोलंबोला होईल. मात्र भारत-श्रीलंका अशी लढत ठरल्यास ती कोलकात्यात हलवली जाईल. भारत उपांत्य फेरीत पोहोचला तरी त्यांचा सामना मुंबईतच होईल याची हमी नाही.
अंतिम फेरीसाठी अहमदाबाद हे प्रमुख ठिकाण मानले गेले आहे. परंतु पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचल्यास विजेतेपदाची लढत कोलंबोला हलवली जाईल.
ICC ने सर्व संभाव्य ठिकाणांसाठी तिकीटविक्री सुरू केली असून सामना संबंधित शहरात न झाल्यास तिकीटाची पूर्ण परतफेड देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र चाहत्यांसाठी खरी अडचण प्रवास आणि हॉटेल आरक्षणाची आहे. अनेकांनी आधीच फ्लाइट आणि निवासाची बुकिंग केली तर ठिकाण बदलल्यास आर्थिक फटका बसू शकतो.
या अनिश्चिततेमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम आहे. स्पर्धेतील संघ निश्चित झाल्यावरच अंतिम वेळापत्रक जाहीर होणार आहे. त्यामुळे तिकीट खरेदी करताना परतावा धोरण आणि प्रवास नियोजन काळजीपूर्वक तपासणे आवश्यक ठरणार आहे.





