Malinda Pushpakumara Record : क्रिकेटमध्ये विक्रम रोज होत नाहीत. काही विक्रमांसाठी वर्षानुवर्षे सातत्य, मेहनत आणि संयम लागतो. असााच एक दुर्मीळ आणि भक्कम विक्रम श्रीलंकेच्या डावखुऱ्या फिरकीपटू मलिंदा पुष्पकुमारा याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये रचला आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १००० विकेट्स घेणारा तो श्रीलंकेचा चौथा, तर जगातील २१८वा गोलंदाज ठरला आहे. (Malinda Pushpakumara Record)

कोल्ट्स क्रिकेट क्लब मैदानावर मूर स्पोर्ट्स क्लबविरुद्ध खेळताना पुष्पकुमाराच्या नावावर ९९८ विकेट्स होत्या. सामन्यात त्याने विकेटकीपर सोहन डी लिवेरा आणि पासिंदु सूरियाबंदारा यांना बाद करत ऐतिहासिक ‘हजारी’ पूर्ण केली. हा टप्पा गाठताच त्याचे नाव श्रीलंकेच्या महान गोलंदाजांच्या यादीत कायमचे कोरले गेले.

याआधी श्रीलंकेकडून हा पराक्रम फक्त मुथय्या मुरलीधरन (१३७४ विकेट्स), रंगना हेराथ (१०८०) आणि दिनुका हेट्टियाराची (१००१) यांनी केला होता. आता पुष्पकुमाराही या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

या विक्रमाला अधिक खास बनवणारी बाब म्हणजे पुष्पकुमाराचा स्ट्राईक रेट. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये फक्त 38.3 च्या स्ट्राईक रेटने १००० विकेट्स घेतल्या आहेत, जो मुरलीधरन (48.7) आणि दिनुका हेट्टियाराची (46.6) यांच्यापेक्षा सरस आहे. त्याचा गोलंदाजी सरासरीही प्रभावी असून तो 20.06 इतका आहे. आतापर्यंत त्याने ८६ वेळा पाच विकेट्स, तर २८ वेळा एका सामन्यात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
इतकी जबरदस्त देशांतर्गत कामगिरी असूनही पुष्पकुमाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर फारशी संधी मिळालेली नाही. त्याने श्रीलंकेसाठी फक्त ४ कसोटी सामने खेळले असून त्यात १४ विकेट्स, तर २ वनडे सामन्यांत १ विकेट घेतली आहे. हा आकडा त्याच्या क्षमतेच्या तुलनेत अत्यंत कमी मानला जातो.
जानेवारी २०१९ मध्ये साराकेन्स स्पोर्ट्स क्लबविरुद्ध त्याने एका डावात ३७ धावांत १० विकेट्स घेत इतिहास घडवला होता. विशेष म्हणजे ही कामगिरी त्याने अवघ्या १८.४ षटकांत केली होती. त्याच सामन्यात त्याने ७०० विकेट्सचा टप्पाही गाठला होता.
पुष्पकुमाराचा हा विक्रम केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने घाम गाळणाऱ्या खेळाडूंना मिळालेली मोठी पावती आहे. आंतरराष्ट्रीय संधी मर्यादित असल्या तरी, फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मलिंदा पुष्पकुमाराने स्वतःला अजरामर करून ठेवले आहे.







