KL Rahul Century Celebration : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलने केवळ शतक ठोकले नाही, तर भारतीय संघासाठी संकटमोचकाची भूमिका बजावत आपल्या अनुभवाची आणि संयमाची पुन्हा एकदा चुणूक दाखवून दिली. बुधवारी (14 जानेवारी) झालेल्या या सामन्यात राहुलने नाबाद 112 धावांची खेळी करत भारताचा डाव सावरला. मात्र या शतकाइतकंच चर्चेत राहिलं ते शतक पूर्ण केल्यानंतर त्याने आपल्या लेकीसाठी केलेलं भावनिक आणि अनोखं सेलिब्रेशन.

भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली होती. शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि विराट कोहली हे तिन्ही प्रमुख फलंदाज स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर भारताची अवस्था 4 बाद 118 अशी झाली होती आणि मोठ्या धावसंख्येचं स्वप्न धूसर होताना दिसत होतं. अशा दबावाच्या क्षणी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या केएल राहुलने परिस्थितीचा अचूक अंदाज घेत संयमी आणि जबाबदार खेळ केला.
राहुलने प्रथम रवींद्र जडेजासोबत 73 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत डाव स्थिर केला. त्यानंतर नितीश कुमार रेड्डीसोबत 57 धावांची भागीदारी करत त्याने भारतीय डावाला गती दिली. अखेर 49व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत राहुलने आपले शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 1 षटकार लगावला.
शतक पूर्ण होताच राहुलने हेल्मेट काढून डाव्या हातातील ग्लोव्ह काढली आणि प्रेक्षकांच्या दिशेने खास इशारा केला. हा इशारा त्याने आपल्या लेकीसाठी समर्पित केला होता. मैदानात ‘राहुल… राहुल…’चा जयघोष घुमू लागला. विशेष म्हणजे, हे सेलिब्रेशन राहुलने पहिल्यांदाच केलेले नाही. गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध अहमदाबादमध्ये झालेल्या कसोटी सामन्यातही त्याने आपल्या लेकीसाठी अशाच पद्धतीने भावना व्यक्त केल्या होत्या.
राहुलच्या या शतकी खेळीमुळे भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 285 धावांचे आव्हान उभे केले आहे. धावफलकावरील आकड्यांइतकंच, या खेळीमधून राहुलने संघासाठी आपली उपयुक्तता आणि मानसिक कणखरता पुन्हा सिद्ध केली आहे.







