India vs Zimbabwe: दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या मोठ्या पराभवानंतर टीम इंडियाचा नेट रनरेट (NRR) तब्बल -3.800 वर घसरला असून, उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी भारतासमोर मोठे आव्हान आहे. भारत ज्या गटात खेळत आहे, तो ‘ग्रुप ऑफ डेथ’ म्हणून ओळखला जातो. कारण या गटातील भारतासह झिम्बाब्वे, वेस्ट इंडीज आणि साउथ आफ्रिका या सर्व संघांनी साखळी फेरीत एकही सामना गमावलेला नव्हता.

मात्र, अलीकडील पराभवानंतर भारताची स्थिती डळमळीत झाली आहे. आता केवळ विजय मिळवणे पुरेसे ठरणार नाही, तर नेट रनरेटमध्ये लक्षणीय सुधारणा करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गटातील संघांचे गुण समान राहिल्यास नेट रन रेट निर्णायक ठरणार आहे.
भारताचा पुढील सामना 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वे विरुद्ध होणार असून, या लढतीत मोठ्या फरकाने विजय मिळवणे अत्यावश्यक आहे. भारताने प्रथम गोलंदाजी केल्यास झिम्बाब्वेला कमीत कमी धावसंख्येवर रोखणे आणि त्यानंतर लक्ष्य वेगाने गाठणे गरजेचे ठरेल.
उदाहरणार्थ, झिम्बाब्वेने 90 धावांचे लक्ष्य दिल्यास भारताने ते अवघ्या 9 षटकांत पूर्ण केल्यास नेट रन रेट मध्ये मोठी वाढ होऊ शकते. 150 धावांचे लक्ष्य असल्यास 11 षटकांत विजय मिळवणे आवश्यक ठरेल, जे आव्हानात्मक असले तरी अशक्य नाही. 180 ते 200 धावांचे लक्ष्य मिळाल्यास 12 ते 15 षटकांत सामना संपवावा लागेल, तेव्हाच रनरेटमध्ये अपेक्षित सुधारणा साधता येईल.
लक्ष्य जितके मोठे, तितका आवश्यक धावगतीचा दर अधिक राहणार असल्याने भारताच्या फलंदाजांना आक्रमक आणि धाडसी खेळ करावा लागणार आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा सामना ‘करो किंवा मरो’ ठरणार आहे.



