पुणे: पुण्यातील उच्चभ्रू विमाननगर (Pune News) भागात एका स्पा सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर तरुणीने इमारतीवरून उडी मारल्याने तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) वर्ग केला आहे.

विमाननगरमधील एका इमारतीत स्पा सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या पथकाने तिथे छापा टाकला. मात्र, पोलिसांना पाहताच घाबरलेल्या एका तरुणीने आणि तिथे असलेल्या व्यवस्थापकाने स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरून थेट खाली उडी घेतली होती. दरम्यान, तरुणीचा मृत्यू झाला असून व्यवस्थापक गंभीर जखमी झाला होता.
या घटनेनंतर मृत तरुणीच्या नातेवाईकांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन “या मृत्यूला जबाबदार कोण?” असा सवाल केला. दरम्यान, या प्रकरणी सखोल चौकशी करावी असे सांगितले आहे. आयुक्तांनी हा तपास सीआयडीने करावा असे आदेश दिले आहेत.
मृत तरुणीच्या नातेवाईकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. “छापा टाकला तेव्हा नक्की काय घडले? तरुणीला उडी मारण्यास भाग पाडले गेले ?” दरम्यान, सीआयडी सध्या याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.







