T20 World Cup, Abhishek Sharma: 2026 च्या टी-20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाला धक्का बसला आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा प्रकृती अस्वास्थ्यामुळे संघाबाहेर असून, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही. 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीत त्याचा सहभागही सध्या अनिश्चित मानला जात आहे.

नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी नाणेफेकीदरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी अभिषेक पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे सांगितले होते. “त्याला सावरण्यासाठी थोडा वेळ लागेल. तो एक-दोन सामने गमावू शकतो,” असे सूर्याने म्हटले होते.
दरम्यान, सामन्यानंतर फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांने सकारात्मक संकेत दिले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने सांगितले, “मी अभिषेकशी संवाद साधला आहे. तो आता बरा वाटत असल्याचे म्हणाला आणि त्याने सरावही केला. तो लवकरच पुनरागमन करेल, अशी आशा आहे.”
दिल्लीला पोहोचल्यानंतर अभिषेकची प्रकृती अचानक बिघडली होती. पोटातील संसर्ग आणि उच्च तापामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला असला तरी तो अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. आजारपणामुळे त्याचे वजनही घटल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात अभिषेक खेळणार की नाही, याचा अंतिम निर्णय कोलंबोमध्ये घेतला जाणार आहे. नेट सरावादरम्यान त्याची तंदुरुस्ती आणि दीर्घ सराव सत्रे पार पाडण्याची क्षमता पाहूनच संघ व्यवस्थापन निर्णय घेईल, असे संकेत मिळत आहेत. भारत-पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर अभिषेकच्या प्रकृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







