वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील वडगाव येथील केशवनगर परिसरात रात्री 11 वाजता गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. एका शालेय विद्यार्थिनीला घरी सोडण्याच्या जुन्या भांडणातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे गावामध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, मात्र ते सर्वजण सध्या फरार आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलीस पथके तातडीने रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय मोहिते यांचा चुलत भाऊ वडगाव येथील शाळेत शिकतो. त्याने अभिजित ओव्हाळ आणि रणजित ओव्हाळ यांच्या भावकीतील एका मुलीला शाळेतून घरी सोडले होते. यावरूनच आरोपींनी त्याला शाळेबाहेरून गाडीत बसवून मारहाण केली होती.
याच वादातून, सायंकाळी साडेसहा वाजता आरोपी दुचाकीवरून केशवनगर येथील एकवीरा चौकात आले, जिथे अक्षय मोहिते आपल्या मित्रांसह बसलेला होता. आरोपी सौरभ वाघमारे याने अक्षयच्या दिशेने पिस्तुल रोखले. त्याने गोळी झाडली, परंतु ती निघाली नाही. अक्षय आणि त्याचे मित्र घाबरून पळू लागले, तेव्हा आरोपीने पुन्हा गोळी झाडली. सुदैवाने, ती गोळी अक्षयला लागली नाही आणि तो जवळच्या सोसायटीत लपून बसला. त्यानंतर सर्व आरोपी दुचाकीवरून पळून गेले.
खुलेआम गोळीबार झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. या घटनेने मावळमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचेही दिसून येत आहे. या प्रकरणात सौरभ रोहिदास वाघमारे, अभिजीत राजाराम ओव्हाळ, रणजित बाळासाहेब ओव्हाळ आणि प्रथमेश दिवे या चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







