पुणे: शहरात दुचाकी चोरी आणि मोठ्या प्रमाणावर रोकड लंपास होण्याच्या घटना पुन्हा एकदा समोर येत आहेत. येरवडा परिसरात डिलिव्हरी बॉयचा वेश परिधान करून दुचाकी चोरी करणाऱ्या एका तरुणाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. तर, आंबेगाव पठार येथे थार कारमधून आलेल्या दोघांनी ५० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावल्याचा प्रकार घडला आहे. या दोन्ही घटनांमुळे पुणेकरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

डिलिव्हरी बॉयचा वेश, चोरीसाठी बनवलेली योजना
येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मुसेफ अकिल शेख (वय १९) असून, तो येरवडा परिसरातील ईशान्य मॉलजवळ दुचाकीसह संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आले. तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत शेखने मौजमज्जेसाठी दुचाक्या चोरल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून सुमारे ६० हजार रुपयांच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस तपासात हेही निष्पन्न झाले आहे की, चोरी करताना तो डिलिव्हरी बॉयच्या वेशात वावरत होता, जेणेकरून कोणी संशय घेणार नाही.








