लोणावळा : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील भुशी गावात रायफलमधून गोळी सुटल्याने 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अभय माणिक मराठे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर भुशी गावासह संपूर्ण लोणावळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना भुशी गावातील ‘हॉटेल मोतीराम’च्या परिसरात घडली. अभय मराठे हे त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेली परवानाधारक रायफल साफ करत होते. रायफलची स्वच्छता सुरू असताना अचानक ट्रिगर दाबला गेला आणि बंदुकीतून गोळी सुटली. ही गोळी अभय यांच्या छातीला लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

गोळीचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अभय यांना तातडीने लोणावळ्यातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, छातीमध्ये गोळी लागल्याने त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात जाऊन प्राथमिक चौकशी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, रायफल परवानाधारक असली तरी ती साफ करताना सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन झाले होते का, तसेच रायफलमध्ये गोळी आधीच भरलेली का होती, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.






