चाकण (पुणे) : बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यानी तब्बल ४७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना राणुबाई मळा, चाकण येथे उघडकीस आली. राजू विठ्ठल कणसे (वय ५०, रा. राणुबाई मळा, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चाकण पोलिसांनी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कोणाला कसलाच थांगपत्ता लागू न देता आतील ४५ हजार रुपयांचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व दोन हजार १०० रुपयांचे २३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण ४७ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.