देहूगाव: देहूरोड परिसरातील शिवाजी विद्यालयाजवळील चौकात रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, पादचारी आणि विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. देहूरोडवरील अशा प्रकारे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यात साचलेले पाणी आणि फुटलेली पाईपलाईन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

रस्त्याची दुरवस्था पाहता वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्यांमुळे अनेक वाहनचालक जखमी झाले असून दुचाकी घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शीतळानगर, मामुर्डी आणि जुन्या पुणे-बेंगळुरु महामार्गाकडून येणारी वाहने या खड्ड्यांच्या फेऱ्यात अडकतात. परिणामी नागरिकांना अपघात, वाहतूक कोंडीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कामावर नाराजी व्यक्त केली असून, जर या खड्यांमुळे कोणाचा जीव गेला तर मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असे संतप्त नागरिक म्हणत आहे. जर वेळेवर उपाययोजना झाली नाही, तर सर्वपक्षीय नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.







