Solapur Crime : पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यमान नगरसेवकाने आपल्या साथीदारांसह तीन तरुणांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तिन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नगरसेवक लोकेश यादव आणि त्याचे काही साथीदार पीडितांकडे वारंवार भिशी लावण्याचा आग्रह करत होते. मात्र संबंधित तिघांनी त्यास नकार दिल्याने आरोपी संतापले. याच कारणावरून लोकेश यादव, माजी नगरसेवक नागेश यादव आणि त्यांच्या इतर साथीदारांनी एकत्र येत तिघांवर कोयत्याने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच पंढरपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पीडितांच्या तक्रारीवरून पोलिसांनी लोकेश यादव, नागेश यादव यांच्यासह एकूण 20 जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे पंढरपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. लोकप्रतिनिधीकडूनच अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.







