पुणे: पुण्यातील कोंढवा, येवलेवाडी आणि पिसोळी येथील अनधिकृत प्लॉटिंग आणि बेकायदा बांधकामांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर वाढले आहे. दरम्यान, अशा बेकायदा बांधकामांवर पालिकेने कारवाई केली असून जागा आरक्षित असल्याची बाब नागरिकांच्या लक्षात आली. या फसव्या व्यवहारामुळे अनेक सामान्य नागरिकांची आयुष्याची कमाई क्षणार्धात मातीमोल होत असून, पुणे महानगरपालिकेने या फसवणुकीपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

काय आहे नेमका प्रकार?
शहर अभियंता कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, हवेली तालुक्यातील कोंढवा, येवलेवाडी आणि पिसोळी परिसरातील अनेक जागा संवेदनशील आणि आरक्षित क्षेत्रात येतात. या जागांवर बिल्डर आणि भूमाफियांकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे प्लॉटिंग करून त्यांची विक्री केली जात आहे. केवळ प्लॉटच नाही, तर या प्लॉटवर कोणत्याही परवानगीशिवाय बेकायदा बांधकामेही केली जात आहेत.

मोठी आर्थिक फसवणूक
मोठ्या आकर्षक जाहिराती आणि कमी दराचे आमिष दाखवून हे अनधिकृत प्लॉट आणि बांधकामे सामान्य नागरिकांना विकली जातात. आसपासच्या किमतींपेक्षा कमी दरात घर मिळत असल्याने, अनेक जण पैशांची बचत करण्याच्या नादात या बेकायदा व्यवहारांमध्ये अडकतात. मात्र, एकदा बांधकाम पूर्ण झाले किंवा घर खरेदी झाले की, संबंधित जागा आरक्षित असल्याचे अथवा बांधकाम अनधिकृत असल्याचे महापालिकेकडून नोटीस येते. त्यानंतर पालिकेकडून कारवाई केली जाते आणि नागरिकांनी कष्टाने कमावलेले पैसे वाया जातात. अनेक कुटुंबांची आयुष्याची जमापुंजी यातून वाया जात असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.
पालिकेचे महत्त्वाचे आवाहन:
पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागाने अशा अनधिकृत बांधकामांवर नियमितपणे कारवाई केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी पालिकेने खालील सूचना दिल्या आहेत:
- जागेची खातरजमा करा: कोणतीही जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी ती कायदेशीर आहे की नाही, याची पूर्णपणे पडताळणी करा.
- दस्तावेज तपासा: खरेदी करण्यापूर्वी संबंधित जागेचे अधिकृत दस्तऐवज, नकाशा आणि परवानग्या तपासा.
- आरक्षणाची माहिती घ्या: संबंधित जागा कोणत्याही सरकारी योजनेसाठी किंवा सार्वजनिक वापरासाठी आरक्षित आहे का, याची पालिकेकडून माहिती घ्या.
या प्रकारच्या फसवणुकीतून वाचण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून, प्रत्येक व्यवहार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच करावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. तुमची आयुष्यभराची कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी ही खबरदारी अत्यंत आवश्यक आहे.







