यवत, ता. 23 : “तुमचे लोनचे हप्ते थकले आहेत, गाडी ओढून नेतो” अशी धमकी देत अज्ञात इसमांनी चारचाकी वाहनाला दुचाकी अडवून दाम्पत्याला दमदाटी करीत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी दोन अनोळखी इसमांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस टोलनाका परिसरात रविवारी (ता. 22) सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.

याप्रकरणी अक्षय भाऊसाहेब सानप (वय -30, रा. फातीमानगर चौक, पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार यवत पोलिसांनी अज्ञात दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय सानप हे पत्नी ऋषाली सानप यांच्यासह 21 फेब्रुवारी रोजी देवदर्शनासाठी अक्कलकोट येथे गेले होते. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी देवदर्शन करून ते सोलापूर–पुणे मार्गे परतत असताना सायंकाळी सुमारे सव्वाचार वाजता पाटस टोल नाका येथून पुढे 200 मीटर अंतरावर दोन अनोळखी इसमांनी मोटारसायकल आडवी लावून त्यांची गाडी अडवली.
“तुमच्या गाडीचे हप्ते थकले आहेत, वाहन जप्त करायचे आहे,” असे सांगत संबंधित इसमांनी गाडी थांबवण्यास भाग पाडले. मात्र फिर्यादी यांनी हप्ते थकले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरही संशयितांनी उध्दट भाषेत बोलत गाडी बाजूला घेण्याचा दबाव टाकला. पत्नी सोबत असल्याने व परिस्थिती संशयास्पद वाटल्याने सानप यांनी तेथून निघण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित दोघांनी मोटारसायकलवरून थेट यवतपर्यंत पाठलाग केला.
दरम्यान, सायंकाळी सुमारे पाऊणे पाच वाजता बँक ऑफ बडोदा यवत शाखा समोर पुन्हा गाडी अडवून “तुझी गाडी ओढून नेऊ, यवतमधून जाऊनच दाखव” अशी धमकी देत शिवीगाळ केली. फिर्यादी अक्षय सानप यांनी प्रसंगावधान राखत संशयितांच्या काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलचा (क्रमांक MH 42 BR 07) फोटो काढला आणि तत्काळ डायल 112 वर संपर्क साधून पोलिसांची मदत मागितली. पोलिस येत असल्याचे लक्षात येताच दोन्ही इसम घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात BNS कलम 126(2), 352, 351(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार खोमणे करीत आहेत.







