पुणे: पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून लढण्याची भूमिका असली, तरी परिस्थितीनुसार भाजप स्वतंत्रपणेही मैदानात उतरण्याची तयारी ठेवत असल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे या निवडणुकीच्या चर्चांना आणखी वेग आला आहे.

पंढरपूर येथे माध्यमांशी बोलताना जयकुमार गोरे यांनी सांगितले की, निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढायची की महायुतीच्या माध्यमातून, याचा अंतिम निर्णय पक्षातील वरिष्ठ नेते घेतील. मात्र, पक्षाकडून जी भूमिका निश्चित केली जाईल, त्यानुसार निवडणुकीला सामोरे जाण्यास कार्यकर्ते तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे विभागात पदवीधर आणि शिक्षक अशा 2 मतदारसंघांचा समावेश आहे. या विभागात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 5 जिल्ह्यांचा समावेश होतो. निवडणुकीसाठी मतदार याद्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून अधिकृत अंतिम याद्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.

गेल्या निवडणुकीतील पराभवाचा उल्लेख करत गोरे यांनी पक्षाने यावेळी आधीपासून तयारी सुरू केल्याचे सांगितले. मतदार नोंदणीपासून संघटनात्मक पातळीवरील बैठका आणि संपर्क वाढवण्यावर भाजपचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.







