उरुळी कांचन, (पुणे): जुन्या वादाच्या कारणातून खून करून पळून गेलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखा व उरुळी कांचन पोलिसांनी सोलापूर येथून ताब्यात घेतले आहे. अशी माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली आहे.

स्वप्निल शिवाजी चौधरी व आदेश रेवलनाथ चौधरी (रा. दोघेही नायगाव, पेठ, ता. हवेली) असे खून करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. तर संपत तुकाराम चौधरी (वय 48, रा. वडाचीवाडी पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी यश संपत चौधरी यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी (ता. 19) उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. 19) पेठ गावच्या हद्दीत, थेऊर-पेठ रोडलगत म्हसोबा मंदिराजवळील शेतात संपत चौधरी यांचा अज्ञात व्यक्तींनी हत्याराने मारहाण करून खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासासाठी उरुळी कांचन पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेची एकूण दोन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली होती. तपासादरम्यान स्वप्निल चौधरी व आदेश चौधरी यांचा मध्यप्रदेश (उज्जैन) व सोलापूर येथे शोध घेण्यात येत होता. तांत्रिक तपासाच्या आधारे व मिळालेल्या माहीतीच्या आधारे आरोपींना सोमवारी (ता. 29) सोलापुर येथे असल्याची माहीती प्राप्त झाल्यानंतर त्यांना उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेतले.
आरोपींकडे खुनाच्या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता आरोपी व मयत संपत चौधरी यांच्याशी यापूर्वी वाद झाला होता. या वादातून गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या वादातुन सदरचा गुन्हा आरोपींनी संगनमताने केला असल्याची माहिती पोलिसांना दिली. सदर बाबींच्या अनुषंगाने गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून, आरोपीस न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी रिमांड घेऊन अधिक सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस उप-निरीक्षक प्रविण कांबळे, गुन्हे शाखेचे उप-निरीक्षक अमित सिद-पाटील, हवालदार योगेश नागरगोजे, अजित भुजबळ, राजु मोमिन, सहायक फौजदार रमेश भोसले, सुनिल सस्ते, उरुळी कांचनचे पोलीस हवालदार प्रविण चौधर, अजित काळे, निलेश जाधव, सचिन जगताप, विशाल रासकर, उध्दव गायकवाड, प्रशांत पवार, सुदर्शन माने, अमोल राउत, सुमित वाघ यांच्या पथकाने केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक प्रविण कांबळे हे करीत आहेत.







