Uruli Kanchan Accident: उरुळी कांचन: पुण्यातील उरुळी कांचन – जेजुरी मार्गावरील शिंदवणे (ता. हवेली) हद्दीतील घाटात टेम्पो पलटी झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर रस्त्यावर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. (Uruli Kanchan Accident)

चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून वाहनातील चालक आणि इतर प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.
दरम्यान, या अपघातामुळे घाटात एका बाजुची वाहतूक बंद झाली असून वाहतूक कोंडी झाली आहे. काही नागरिकांनी सदरची माहिती उरुळी कांचन पोलिसांना दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघाताचे नेमके कारण व चालकाचे नाव अद्याप समजू शकले नाही.






