उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाटा (ता. हवेली) परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री दोन दुचाकी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. किनारा हॉटेलच्या पार्किंगमधून आणि शेजारच्या महादेवनगर भागातून चोरट्यांनी शाईन आणि पल्सर गाड्यांवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत नवनाथ बाळासो आढाव (वय-50, रा. सोरतापवाडी फाटा, ता. हवेली) यांनी यासंदर्भात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता.11) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास होंडा शाईन मोटारसायकल घेऊन सोरतापवाडी फाट्यावरील किनारा हॉटेल येथे चहा पिण्यासाठी गेले होते. घर आणि हॉटेल जवळच असल्याने त्यांनी आपली गाडी हॉटेलच्या पार्किंगमध्येच उभी केली आणि ते जवळच असलेल्या पुण्याई नर्सरी येथे कामासाठी गेले.

दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. 12) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आढाव हे आपली गाडी आणण्यासाठी किनारा हॉटेल येथे गेले असता, पार्किंगमध्ये उभी केलेली गाडी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला; मात्र गाडीचा काहीही सुगावा लागला नाही. गाडीचा शोध घेत असतानाच आढाव यांच्या ओळखीचे लक्ष्मण शामराव रणखांबे (रा. महादेवनगर, सोरतापवाडी फाटा) यांनीही त्यांची बजाज पल्सर गाडी रात्रीतून चोरीला गेल्याचे सांगितले.
चोरट्यांनी एकाच रात्रीत दोन्ही दुचाकींवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चोरीला गेलेल्या वाहनांमध्ये गाडी क्रमांक MH 12 YE 5652 होंडा शाईन 90 हजार रुपये किमतीची व बजाज पल्सर गाडी क्रमांक: MH 22 W 5397 ही 30 हजार रुपये किमतीची दुचाकी असा 90 हजार रुपयांच्या दोन दुचाकी चोरून नेहल्या.
दरम्यान, सर्वत्र शोध घेऊनही गाड्या न मिळाल्याने अखेर पीडितांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास अंमलदार पोलीस हवालदार जाधव करत आहेत.






