शिरूर: शिरूर तालुक्यातील हजारो ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांच्या हितासाठी रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे घोडगंगा कारखाना सुरू करण्यासाठी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होत्या. कारखान्याला आवश्यक अर्थसहाय्य मिळण्यासाठी ‘एनसीडीसी’कडे सादर केलेल्या कर्ज प्रस्तावातील त्रुटी तातडीने दूर करून सुधारित प्रस्ताव नव्याने सादर करावा. अशी स्पष्ट सूचना पवार यांनी संबंधित यंत्रणांना केली.

घोडगंगा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शिरूर तालुक्यातील ९८ गावांचा समावेश असून, सुमारे २० हजार सभासद आहेत.गत तीन गळीत हंगामांपासून कारखाना बंद असल्याने शेतकरी, कामगार, वाहतूकदार, लघुउद्योजक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

कारखाना हा केवळ साखर उत्पादनाचा प्रकल्प नसून शिरूर तालुक्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. कारखाना सुरू झाल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह कारखान्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जोडलेल्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असल्याने शासनस्तरावर आवश्यक ती पावले वेगाने उचलावीत,असे त्यांनी सांगितले. कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक बाबींचा आढावा घेऊन संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कारखाना व्यवस्थापनाची तातडीने स्वतंत्र बैठक आयोजित करून कारखाना सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
बैठकीस सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार ज्ञानेश्वर कटके, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख, सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे, साखर आयुक्त डॉ.संजय कोलते आदी अधिकारी व शिरूर तालुक्यातील संबंधित पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रस्तावांची दुरुस्ती किती वेळा? घोडगंगा कधी सुरू होणार?
कर्ज प्रकरणाचा प्रस्ताव अनेकवेळा दुरुस्त करून सादर करण्यात आला; तरीही घोडगंगा कारखाना सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे. आता ‘अजून किती दिवस वाट पाहायची? कारखाना प्रत्यक्षात कधी सुरू होणार?’ असा सवाल शिरूर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी उपस्थित करीत आहेत. केवळ प्रस्तावांच्या दुरुस्तीपलीकडे जाऊन शासनाने ठोस निर्णय घेऊन कारखाना तातडीने सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.






