पुणे: पावसाळा सुरू झाल्यापासून गडकिल्ल्यांवर फिरण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. हिरवाईने नटलेले किल्ले आणि धबधबे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक विकेंडला बाहेर पडत आहेत. पुण्याजवळील सिंहगड किल्ल्यावरही सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, याच गर्दीतून वाद आणि भांडणाचे प्रकार समोर येत आहेत.

सिंहगडावर दोन पर्यटकांच्या गटांमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाल्याची माहिती आहे. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, काही वेळातच हा वाद चिघळला आणि दोन्ही गटांमध्ये मारामारी सुरू झाली. संतापलेल्या पर्यटकांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. काही जणांनी एकमेकांचे कपडेही फाडल्याचे समोर आले आहे.

कपडे फाडले, दगड उचलले, लाथा बुक्क्यांचा मारा! किल्ले सिंहगडावर भर पावसात तुफान राडा pic.twitter.com/RCJCn5SIgD
— bharat jadhav (@bharatjadhav891) August 16, 2026

वाद वाढल्यानंतर काही पर्यटकांनी चक्क दगड उचलून समोरच्या गटाच्या दिशेने फेकल्याची माहिती मिळत आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या मारामारीत काही तरुणांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती नाही.
घटना घडली त्यावेळी सिंहगडावर मोठी गर्दी होती. विशेषतः पुणे दरवाजा परिसरात पर्यटकांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. याच दरम्यान दोन्ही गटांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर सिंहगडाप्रमाणेच लोहगड, विसापूर, राजगड आणि रायगडावरही पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळे गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.







