मुंबई : कुलाबा परिसरातील नेव्ही नगरमध्ये नौदलात कार्यरत असलेल्या जवानासह त्याच्या कुटुंबातील चौघांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पुरणलाल मेहरा (30), त्यांची पत्नी ओमा, तीन वर्षांचा मुलगा यश आणि अवघ्या दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

15 ऑगस्टच्या रात्री पुरणलाल यांच्या वडिलांनी त्यांना फोन केला होता. मात्र, अनेकदा संपर्क साधूनही मुलाने फोन न उचलल्याने त्यांना चिंता वाटू लागली. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट नौदलाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. त्यानंतर नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी मेहरा यांच्या घरी जाऊन पाहणी केली.

घरात पुरणलाल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. तर त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले बेडवर बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याची तयारी करण्यात आली. मात्र, त्यापूर्वीच चौघांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले.

दरम्यान, पोलिसांच्या तपासात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुरणलाल यांनी टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी वडिलांच्या मोबाईलवर “आमचे मृतदेह घेऊन जा” असा मेसेज पाठवल्याची माहिती आहे. या मेसेजची पोलिसांकडून तांत्रिक तपासणी केली जात आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही.
प्राथमिक तपासानुसार, पुरणलाल यांनी पत्नी आणि मुलांना जेवणातून विष दिले असावे आणि त्यानंतर स्वतः गळफास घेतला असावा, असा संशय पोलिसांना आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही.
नोकरीचा ताण, कौटुंबिक समस्या किंवा अन्य कोणते कारण होते का, याचा तपास सुरू आहे. नौदल प्रशासनाकडूनही पोलिसांना तपासासाठी सहकार्य केले जात आहे.






