पुणे: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवरून नवा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. पक्षाने डॉ. स्मिता योगेश जाधव यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर शरद लाड यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात धाव घेतली. त्यामुळे भाजपच्या गोटात चर्चेला उधाण आले आहे.

भाजपने 4 ऑक्टोबर रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली. त्यामध्ये पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांची नावे जाहीर करण्यात आली. शरद लाड हे पुणे पदवीधर मतदारसंघासाठी इच्छुक होते आणि त्यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होती. मात्र, पक्षाने ऐनवेळी जाधव यांना संधी दिली.

यानंतर शरद लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. ‘पक्षानेच मला अर्ज दाखल करण्यास सांगितले’, असा दावा त्यांनी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अधिकृत उमेदवार असताना लाड यांनी अर्ज कोणत्या भूमिकेतून दाखल केला, याबाबत राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, या घडामोडींचे अंतिम राजकीय चित्र अर्ज छाननी आणि पुढील प्रक्रियेनंतर अधिक स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील कौस्तुभ गावडे यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही उमेदवारांनी निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, निवडणुक 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता उमेदवारी अर्जांची छाननी आणि कोण माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






